दुबई - सायकलिंगसाठी अनुकूल शहर

दुबईतील उष्ण हवामानामुळे हे शहर सायकलिंगसाठी अनुकूल नसावे अशी अनेकांची भावना असेल. परंतू ‘दुबईसह संपूर्ण यूएई मध्ये सायकलिंग हा खूप लोकप्रिय खेळप्रकार आहे’ असे म्हटले तर यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. अनेकांना आश्चर्य वाटावे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे सायकलिंगसाठी सुविधा पुरवल्या जातात. आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी दुबई शहरातील हजारो सायकल प्रेमी आपली सायकल घेऊन खास सायकलिंगसाठी बनवलेल्या ट्रॅकवर सायकल चालवण्यासाठी बाहेर पडतात. येथील सायकलिंग ट्रॅक हे जगातील सर्वोत्तम प्रकारचे आहेत. सायकलस्वारांच्या सुरक्षिततेची येथे प्राधन्याने काळजी घेतली जाते. सायकल चालवतांना अपघात टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अलमक्तूम हे स्वतः एक सायकलिंगप्रेमी असून, त्यांच्या प्रयत्नामुळे येथे सायकलिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

दुबईतील सायकलचा इतिहास फार काही जुना नाही. १९६० च्या दशकात खनिजतेलाचा शोध लागल्यानंतर अनेक पाश्चिमात्य अभियंते आणि कामगार हे दुबईसह अबुधाबी सारख्या शहरात कामासाठी येऊ लागले. यातील बहुतांश कामगार हे ब्रिटिश होते. ब्रिटिश आपल्या बरोबर चैनीच्या अनेक गोष्टीही घेऊन आले. त्यात सायकलचा देखील समावेश होता. त्याकाळी ब्रिटिश बनावटीच्या सायकल जगभर खूप लोकप्रिय होत्या. सुरुवातीच्या काळात सायकलचा उपयोग हा ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या कॅम्प मध्ये केला जात असे. कालांतराने ही सायकल तेलाच्या कारखान्यातील दूरवरच्या साईटवर किंवा कार्यालयात जाण्यासाठी वापरली जाऊ लागली. पुढे शहराचा जस जसा पायाभूत विकास होत गेला तशी दुबईत सामान्य माणसाकडे सायकल येऊ लागली. 


दुबईतील सायकल ट्रॅक


अँस्टरडॅम शहरानंतर आता दुबई हे 'सायकलिंग फ्रेंडली सिटी' म्हणून नावारूपाला येत आहे. यासाठी इथले सरकार खूप प्रयत्नशील असून, २०२६ पर्यंत संपूर्ण दुबई अमिरात मध्ये एकूण ७३७ कि. मी. लांबीचा सायकल मार्ग बांधून पूर्ण होईल. हा मार्ग शहरातील जुम्हैरा, मिडिया सिटी, इंटरनेट सिटी आणि जेबीआर या सारख्या महत्वाच्या रहिवाशी तथा व्यावसायिक ठिकाणांना एकमेकांशी जोडणार आहे. हा संपूर्ण मार्ग फक्त सायकलसाठी राखीव राहणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, तसेच दुबईला जगातील आरोग्यदायी शहर बनवणे हे महत्वाचे उद्धेश इथल्या सरकाने डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. दुबईतील सायकलिंग ट्रॅक हे समुद्रकिनारे, वाळवंट, बगीचे आणि सुंदर रस्त्याच्या बाजूने जात असल्या कारणाने येथे सायकलिंग करणे एक सुखद अनुभव असतो. तसं वर्षभर दुबईभर सायकलिंगचा अस्वाद घेता येतो. कडक उन्हाळ्यातही अनेक सायकलप्रेमी दुबईच्या सलकलिंग ट्रॅकवरून फिरताना दिसतात. परंतु खास करून हिवाळ्यात जेंव्हा इथले वातावरण आल्हादायक असते तेंव्हा अनेक जण आपली सायकल बाहेर काढून शहरभर सायकलिंगचा आनंद लुटतात. सरकारच्या उत्तेजनेमुळे सायकलिंग हा आता दुबईत खूप लोकप्रिय आणि हौशी क्रीडाप्रकार ठरत आहे. एक हौशी क्रीडाप्रकार सोडल्यास दुबईतील अनेक उपनगरात सायकलचा वापर मोठया प्रमाणात केला जाते. देअरा, बरदुबई किंवा करामा यासारख्या भागातील अनेक सामान्य कामगार रोज सायकल वापरतात. छोट्यामोठ्या सामानाची ने आण, किराणा सामानाची डिलिव्हरी, जेवणाची डिलिव्हरी किंवा येण्या-जाण्यासाठी शक्यतो येथे सायकलच वापरली जाते. त्यामुळे सायकल दुरुस्त करणारी अनेक दुकाने गल्लीबोळात पाहायला मिळतात.

सायकल प्रेमी राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद अलमक्तूम


दुबई हे सायकलिंगसाठी अनुकूल शहर असले तरी, येथे सायकल चालवण्यासाठी खूप कडक नियम देखील आहेत आणि प्रत्येकाला त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. कायद्यानुसार प्रत्येक सायकलस्वाराने हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालणे येथे बंधनकारक आहे. सायकलिंग करतांना आपले ओळखपत्र (एमिरेट्स आयडी / Emirates ID) बाळगणे गरजेचे आहे. सायकलस्वारांना पदपथ किंवा मुख्य रस्त्यावरून सायकल चालवण्यास बंदी आहे. सायकलस्वार फक्त सायकलिंग ट्रॅक किंवा ६० किमी प्रति तास स्पीड लिमिट असलेल्या दुय्यम रस्त्याचा वापर करू शकतात. वाहतूक पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या कारणामुळे मुख्य रस्त्यावरून सायकल चालवण्यास येथे बंदी घातलेली आहे. हे नियम मोडणाऱ्यास ६०० दिरहम (१२००० रु) पर्यंत दंड आणि त्याची सायकल जप्त केली जाते. रात्रीचे अपघात टाळण्यासाठी येथे इतर वाहनांप्रमाणे सायकलला पुढचा आणि मागचा लाईट असणे बंधनकारक आहे. झेब्रा क्रॉसिंग पार करतांना सायकलवरून उतरणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सायकल चालवताना पादचाऱ्यांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी सायकलस्वाराने घायची आहे. सायकल चालवत असतांना कानात हेडफोन घालण्यासही येथे बंदी आहे. सायकलवर डबल सीट जाणे येथे दंडनीय आहे. यासाठी किमान २०० दिरहम (४००० रु) दंड आकारला जातो.  सायकल पार्क करण्यासाठी देखील महत्वाचे नियम वाहतूक विभागाने आखून दिलेले आहेत. सायकल फक्त ठिकठिकाणी बनवलेल्या सायकल पार्किंगमध्येच पार्क करावी लागते. शहरात अनेक ठिकाणी विशेषतः मेट्रो स्थानका बाहेर सायकल पार्क करता येऊ शकते. विविध इमारतींबाहेर सायकल पार्क करण्यासाठी खास सुविधा करण्यात आलेल्या आहेत. इतर ठिकाणी पार्क केलेल्या सायकल महानगर पालिका उचलून नेऊ शकते. दुबई त्यामानाने सुरक्षित शहर असले तरी, येथे कधी कधी सायकल चोरीला जाऊ शकते. त्यामुळे सायकल पार्क करतांना याची काळजी घ्यावी लागते.


मेट्रो स्थानकाबाहेरील सायकल पार्किंग


दुबई शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी करण्याच्या उद्धेशाने येथील रस्ते आणि वाहतूक विभाग (RTA) हा सायकलचा वापर वाढावण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असे उपक्रम राबवत आहे. 'करीम बाईक' हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. रस्ते आणि वाहतूक विभाग आणि करीम या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करीम बाईक ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून भाडेतत्वावर सायकल मिळवता येऊ शकते. करीमने यासाठी दुबईभर जवळपास ३५० स्वयंचलित केंद्रे उभारली आहेत. सायकल भाड्याने घेण्यासाठी करीम बाईक या मोबाईल ऍप मध्ये खाते उघडावे लागते. करीमच्या स्वयंचलित केंद्रावर जाऊन तेथे पार्क केलेल्या सायकलचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऍपवर पाच अंकी कोड तयार होतो. हा कोड तेथील पार्किंग मशीनमध्ये टाकल्यानंतर सायकल अनलॉक होते. तुम्ही घेतलेली ही सायकल कुठल्याही केंद्रावर परत पार्क करू शकता. करीमची सर्व स्वयंचलित पार्कींग केंद्रे ही सौरऊर्जेवर चालतात. सगळ्या सायकल या आधुनिक बनावटीच्या असून त्या पेडल असिस्ट (Pedal Assist) या तंत्रज्ञानावर चालतात. यामुळे कमी प्रयत्नात जास्त अंतर पार करता येऊ शकते. करीम बाईक या दुबईतील टॅक्सी पेक्षा फार स्वस्त असल्यामुळे त्या फार लोकप्रिय ठरत आहेत. करीम च्या सायकल वापरताना सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. या सायकल चालवताना स्वतःकडे हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असणे गरजेचे आहे. करीम बाईक सारख्या इतर अनेक खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या सायकल प्रेमींसाठी अनेक सुविधा पुरवत आहेत. 


करीम बाईक पार्किंग स्टेशन


सामान्य माणसांना जसे येथे सायकल चालवण्यासाठी उत्तेजन दिले जाते, त्याच पद्धतीने जागतिक स्तरावरील रोड सायकलिंग स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना देखील एक जागतिक मंच उपलब्ध करून देण्याचे काम येथील सरकार करत आहे. यूएईमध्ये आयोजित होणारी 'यूएई टूर' ही रोड सायकलिंग स्पर्धा अल्पावधीतच जगातील सायकलिंग खेळाडूंसाठी आकर्षण ठरली आहे. या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात युसीआई वर्ल्ड टूर (UCI World Tour) च्या माध्यमातून केले जाते. यूएई टूर ही सात वेगवेगळ्या टप्प्यातील एक आव्हानात्मक स्पर्धा आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना यूएईच्या विविध भौगोलिक परिस्थितीचा सामना करत अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. जागतिक नामवंत खेळाडू आणि संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. 


यूएई टूरचे दृश्य

सरकारने प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. सायकलिंगसाठी अनुकूल वातावरण नसतांनाही केवळ सरकारी प्रयत्नांमुळे दुबईत सायकलिंग हा पर्यावरणपूरक क्रीडा प्रकार सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय होत आहे. भविष्यातील इंधनाची अनिश्चितता ध्यानात घेऊन सरकारने योग्यवेळी उचललेले हे पाऊल नक्कीच त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. दुबईत जगभरातील लोक जसे पर्यटनासाठी येतात तसेच ते वाळवंटातील सायकलिंगचा अनुभव घेण्यासाठी देखील येऊ लागले आहेत.

   

टिप्पण्या